“कौटिल्याचे अर्थशास्त्र” हा प्राचीन भारतातील राजकीय , आर्थिक , सामाजिक त्याचबरोबर इतर विषयांवर प्रकाश टाकणारा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. याच ग्रंथात राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर स्पष्टपणे भाष्य केलेले दिसते. या आधीचे अनेक इतर ग्रंथ किंवा वाङमय हे आहे परंतु ते कौटिल्याइतके एखाद्या गोष्टीवर स्पष्टपणे मत मांडताना दिसत नाही.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजकारणाबरोबरच , प्रशासन , आर्थिक कारभार , कर व्यवस्था , नाणी , त्यांची गरज , वेगवेगळ्या प्रकारचे दंड देण्याचे प्रकार इ. यांचे स्पष्टपणे नियम हे सांगितले आहेत. अर्थशास्त्रामधून आपल्याला कौटिल्याच्या काळातील नाणी , नाणी पाडण्याचे तंत्र , नाण्यासाठी वापरले जाणारे धातू , त्यांचे वजन आणि दंड म्हणून किती नाणी घ्यावीत इ. ची सखोल माहिती मिळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पण , अर्धापण , पावपण , अष्टमांश पण , ही चांदीची नाणी तसेच माषक , अर्धमाषक , काकणी , अर्ध काकणी हया नावाच्या तांब्याच्या नाण्यांचे उल्लेख सापडतात.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सोन्याच्या नाण्यांचा उल्लेख आलेला नसला तरी सोन्याची नाणी पाडली जात नसत म्हणणे चूक ठरेल. अर्थशास्त्राच्या आधीचे जे ग्रंथ किंवा वाङमय आहे त्यात कौटिल्याने सांगितलेल्या नाण्यांचा उल्लेख तर येतोच त्याचबरोबर इतर नाणी ही सापडतात.
ऋग्वेदात ‘निष्क’ या नावाच्या प्रसिद्ध नाण्याचा उल्लेख आपल्याला सापडतो त्याचप्रमाणे ऐतरेय ब्राम्हण , श्रौतसूत्र , महाभारत यासारख्या कौटिल्याच्या आधीच्या ग्रंथात सुद्धा निष्काचा उल्लेख आलेला आहे. संपन्नता दर्शविण्यासाठी ‘नैष्कशतिक’ आणि ‘नैष्कसहस्त्रिक’ ही दोन विशेषणं आपल्याला वाङमयात सापडतात तसेच ” नहि निष्कधन: शतनिष्कधनेन स्पर्धते ” म्हणजेच एक निष्क असलेला व्यक्ती शंभर निष्क असलेल्या व्यक्तीशी स्पर्धा करण्याचे साहस करू शकत नाही” असाही उल्लेख आलेला आहे. मनुस्मृतीनुसार निष्क ४ सुवर्ण किंवा ३२० रत्ती (गुंजा) इतक्या वजनाचे होते.
निष्काच्या संदर्भात महाभाष्यात एक उल्लेख येतो तो असा, ” किमय ब्राम्हणोSर्हति ? शतमर्हति शत्य | शतिक:|
साहस्त्र:| नैष्किक इति न सिध्यति” [महाभाष्य , सूत्र ५|१|१९]
ब्राह्मणांच्या योग्यतेसंबंधी प्रश्न विचारताना म्हंटले जायचे कि,” हा ब्राम्हण शंभराची योग्यता असलेला , सहस्त्राची योग्यता असलेला की एक निष्काची योग्यता असलेला आहे?” (शंभर आणि सहस्त्र नाण्याची योग्यता मुख्यतः चांदीच्या नाण्यांची योग्यता दक्षिणा असा अर्थ येथे संभवतो.)
पाणिनीच्या काळात बनारसी रेशमी शेल्याची किंमत दोन निष्क (द्विनैष्कीक) होती. पतंजलीच्या काळापासून निष्काचा उपयोग हा मोठया प्रमाणावर होई. निष्का बरोबरच सोन्याचे ‘सुवर्ण’ नावाचे दुसरे एक नाणे प्रचलित होते. सुवर्णाचे वजन १ कर्ष किंवा ८० गुंजा (१७५ ग्रेन्स) इतके असे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात निष्क आणि सुवर्ण या नाण्यांचे उल्लेख हे जरी नसले तरी या प्रकारची सोन्याची नाणी ही चलनात असली पाहिजेत. कौटिल्यानंतरच्या गुप्तकाळात सुद्धा सोन्याच्या नाण्यांचे उल्लेख तसेच प्रत्यक्षात नाणी ही मोठ्या प्रमाणावर सापडलेली आहेत.
अर्थशास्त्रात “पण” नावाच्या प्रसिध्द नाण्याचे उल्लेख वारंवार येतात. कौटिल्याच्या काळातील रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे हे महत्वाचे नाणे होते. इतर अनेक ग्रंथ आणि वाङमयात सुध्दा ‘पण’ या नाण्याचे उल्लेख आलेले आहेत.
पाणिनीने सांगितलेली ‘आहत’ नाणी म्हणजेच ‘पण’. मनुस्मृतीत आलेले धरण आणि रजत नावाचे नाणे म्हणजेच ‘पण’. इंग्रजीत या नाण्याला ‘punch marked’ म्हणतात. भारताच्या सर्वच भागात ही नाणी सापडलेली आहेत. कोण्या एका राज्याशी किंवा राजाशी किंवा जनपदाशी ही नाणी निगडित नव्हती. प्रत्येक राजा किंवा राज्य किंवा जनपद किंवा गणराज्य यांची स्वतःची अशी ही नाणी होती.
ही नाणी चांदीच्या एका विशिष्ट वजनाची आणि विशिष्ट अशी चिन्ह असलेली नाणी होती. त्यांचे वजन आणि धातूच्या शुद्धतेवरूनच नाण्याची किंमत ठरे.
‘पण’ हे नाणे जरी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात येत असले तरी ‘पणा’बरोबरच ‘शतमान’ आणि ‘शाण’ या दोन नाण्यांचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात येत नाही परंतु अर्थशास्त्राच्या आधीच्या ग्रंथांनी या नाण्यांचा उल्लेख केलेला आहे. शतपथ ब्राह्मणात आलेल्या उल्लेखानुसार शतमान सोन्याचे नाणे होते.
या नाण्याचा उपयोग दक्षिणा देण्यासाठी होई. नंतरच्या कात्यायन श्रौतसूत्रांमध्ये सुवर्ण शतमानाबरोबरच रजत शतमानाचा स्पष्ट उल्लेख येतो. शतमानाबरोबरच ‘शाण’ नावाचे चांदीचे नाणे प्रसिद्ध होते.
पाणिनीच्या अष्टाध्यायीत या नाण्याचा उल्लेख ‘ अध्यर्यशाण्यम् , द्विशाणम् | त्रिशाणम् |’ असे येतात यावरून पाणिनीच्या काळात व्यवहारात वापरण्याचे हे प्रसिद्ध नाणे असले पाहिजे. महाभारतात ‘शाण’ नाण्याचे मूल्य आले आहे. [अष्टौ शाणा: शतमान वहन्ति.] शंभर गुंजा वजन असलेल्या शतमानाचे मूल्य आठ शाण होते म्हणजेच एक शाण म्हणजेच १२.५ गुंजा किंवा २५ ग्रेन्स. चरकाने ‘शाण:’ चे वजन ‘सुवर्ण’ किंवा ‘कर्ष’ या नाण्याचा चौथा हिस्सा ( २० गुंजा ) असे सांगितले आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नाण्याचा धातू आणि कोणत्या धातूची नाणी पाडावीत त्याबद्दल माहिती येते.
लक्षणाध्यक्षाने (टाकसाळतील अधिकाऱ्याने) एक चतुर्थांश भाग तांबे आणि एक मासा लोखंड, जस्त , शिसे , व अंजन यांपैकी एखादा धातू टणकपणासाठी असलेली अशी चांदीची नाणी पाडावीत. पण, अर्धापण, पावपण , अष्टमांश ह्या नावाची तसेच एक चतुर्थांश भाग (हलक्या धातूचे) मिश्रण असलेली माषक , अर्धमाषक , काकणी , अर्धकाकणी ह्या नावाची तांब्याची नाणी पाडावीत. यावरून असे दिसते की, ‘पण’ ह्या नाण्याचे सुद्धा अनेक भाग हे चलनात असून ही चांदीची नाणी होती. त्याचबरोबर तांब्याचे ‘माषक’ नावाचे नाणे आणि याही नाण्याचे इतर भाग हे चलनात होते. नाणी पाडून देण्याबद्दलच्या कामाबद्दल मोबदला किती द्यावा याबाबत कौटिल्य सांगतो की, “नाणी पाडून देण्याबद्दल दस्तुरी शेकडा आठ, वजन मापातील फरकाबद्दल आकारणी शेकडा पाच , पारखणाऱ्याचा मुशाहिरा शेकडा अष्टमांश द्यावा.
खोटी नाणी व्यवहारात येऊ नयेत म्हणून कौटिल्याने अनेक प्रकारचे दंडक घातले होते. नाणे पारखणाऱ्या अधिकाऱ्याने शुद्ध ठरविलेले द्रव्य नाणे पाडण्यासाठी वापरावे. नाणे तपासताना खोटे नाणे आढळल्यास ते तात्काळ तोडून टाकावे आणि ते आणून देणाऱ्यास प्रथम साहसदंड ( ४८ ते ९६ पण ) दंड करावा. नेमून दिलेल्या टांकसाळी वगळता इतरत्र नाणी पाडणारे, विकत घेणारे , विकणारे आणि पारखणारे यांना पंचवीस पण दंड सांगितला आहे. त्याचबरोबर नाणी तपासणाऱ्याने प्रचारात असलेले स्वीकार्य चलन अस्वीकार्य ठरविल्यास किंवा अस्वीकार्य चलन स्वीकार्य ठरविल्यास बारा पण दंड होई.
नाण्यांच्या वजनात आणि शुद्धतेत कौटिल्याच्या अर्थशास्त्रात स्पष्टता जाणवते. पण किंवा कार्षापण याचे वजन ३२ रत्ती (गुंजा) चांदी असे. अर्धापण हा १६ रत्ती (गुंजा) चांदी , ‘पाद’ पावपणाचे मूल्य असलेले नाणे असून त्याचे वजन ८ रत्ती (गुंजा) असे. कर्मकार लोकांचे एका दिवसाचे वेतन हे एक ‘पाद’ असे. अष्टभाग हे नाणे पणाचा आठवा भाग असे ज्याचे वजन ४ रत्ती (गुंजा) असे.
त्यानंतर येणार नाणं म्हणजे ‘माषक’. माषक हे नाणे तांब्याचे तसेच चांदीचे सुद्धा होते. रौप्य माषकाचे वजन दोन गुंजा चांदी आणि तांब्याच्या माषकाचे वजन पाच गुंजा चांदी इतके असे. त्यानंतर ‘काकणी’ हे नाणे माषकाच्या खालोखाल होते. चार काकणी म्हणजे एक माषक. काकाणी नावाच्या नाण्याचा अर्धाभाग म्हणजेच ‘अर्धकाकणी’ हे नाणेदेखील कौटिल्याच्या काळात प्रचारात होते.
अर्थशास्त्रात नाण्यांसंबंधी आलेली माहिती आपण बघितली ती अत्यंत मूलभूत स्वरूपाची आहे. कौटिल्याने सांगितलेली नाण्यांची वजनं आणि शुद्धता ह्या प्राचीन भारतातील नाण्यांमध्ये आपल्याला प्रत्येक राजवटीत आढळून येतात. बनावट नाणी बनवणे किंवा नाण्यांची शुद्धता आणि वजन ह्यामध्ये छेडछाड करणे हा एक गंभीर प्रकारचा गुन्हा समजला जाई.
एकूणच नाणी किंवा चलन हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक हा त्याकाळी होता आणि म्हणूनच कौटिल्य एका श्लोकात खोटे नाणे पाडण्याच्या संबंधात कोणता दंड करावा हे सांगताना लिहितो,” कूटरूपं कारयत: प्रतिगृहणतो निर्यापयतो वा सहस्त्रं दण्डः कोशे प्रक्षिपतो वध:”
खोटे नाणे पाडणाऱ्यास , स्वीकारणाऱ्यास अथवा चलनात वापरणाऱ्यास एक हजार पण दंड करावा, सरकारी तिजोरी (खोटे नाणे) जमा करणाऱ्याला वधाची शिक्षा करावी.
लेखक : नवीन म्हात्रे
9702702546







One comment
Very good