
नाव – मकरंद राजेंद्र जोगवार
पेशाने वकील असणारे मकरंद मुळचे यवतमाळचे. सध्या वकिली पेशामुळे नागपूर येथे राहतात.
शाळेत असताना त्यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. गेली जवळपास १५ ते १६ वर्ष ते नाणी तसेच जुन्या मूर्ती, वस्तू यांचा संग्रह करत आहेत.
छंद माणसाला एक वेगळी ओळख निर्माण करून देतो अशी त्यांची भावना आहे. आपल्या ह्या छंदाबद्दल मकरंद भरभरून बोलतात. ते म्हणतात, ” जुनी नाणी, ऐतिहासिक कागदपत्रे, जुन्या वस्तू ह्यामुळेच इतिहास आपल्याला वर्तमान काळात सुद्धा अनुभवता येतो, त्याबद्दल आपल्याला जाणून घेता येते.”
पेशाने वकील असले तरी एक उत्तम कलाकार असलेल्या मकरंद यांना मातीच्या मूर्ती तयार करण्याची सुद्धा आवड आहे. ह्या अंगभूत गुणामुळेच त्यांचा जुन्या मूर्ती, नाणी यांकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा आहे.
शाळेत असताना काही जुनी नाणी त्यांना मिळाली आणि येथूनच त्यांच्या छंदाची सुरुवात झाली. नाणी जमा करताना त्यांच्या बघण्यात जुन्या मूर्ती, कलात्मक वस्तू आल्या आणि त्यांच्यातल्या कलाकाराने त्या मूर्ती, वस्तू यांचा संग्रह करण्याची प्रेरणा दिली.
मकरंद आपण संग्रहाकडे का वळलो ह्याबद्दल सांगतात ” माझ्यासारख्या नव्या पिढीला आपल्या गौरवपूर्ण इतिहासाची माहिती व्हावी , ह्या इतिहासाचे जतन व्हावे आणि ते पुढील पिढी कडे हस्तांतरित व्हावे, हीच माझी हा संग्रह करण्यामागची भावना आहे.”
संग्रह करताना अनेक चांगले अनुभव आले त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना आलेला भेटण्याचा योग आणि त्यांना भेट म्हणून दिलेली शिवराई. ” महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यवतमाळ दौऱ्यावर आले होते. तेव्हा आम्ही काही विद्यार्थी, काही संघटना त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. माझे सौभाग्य म्हणजे त्यावेळी मला सुद्धा त्यांना भेटण्याची संधी मिळाली. ह्या भेटीदरम्यान त्यांना काहीतरी खास भेटवस्तू द्यावी हा विचार माझ्या मनात होता आणि महाराष्ट्राचे गौरव असलेली, स्वराज्याचे चलन असलेली शिवराई मी त्यांना भेट म्हणून दिली. आज ती शिवराई राजभवनात असावी.”
आज मकरंद यांच्या संग्रहात भारतीय नाण्यांची सुरवात जिथून झाली ती गांधार महाजन पदाची नाणी, यादवांचे सुवर्ण पद्मटंका, मुघल राणी नूरजहाँ , श्री शिव छत्रपतींची नाणी, मराठा साम्राज्याची विविध टांकसाळी मधील नाणी, विविध संस्थानांचे स्टॅम्प पेपर, पोस्ट तिकिटे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध मूर्ती आहेत.
असाच विविध विषयांचा संग्रह करून त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा मानस सुद्धा मकरंद यांनी बोलून दाखवला.






