नाव –

ठाण्यात राहणारे प्रतिक थायसनकृप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनी मध्ये पायपिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून इतिहासाची आवड असणाऱ्या प्रतिक यांना कॉलेज दिवसांपासून गडकोटांवर फिरण्याची आवड होती. ह्या  भटकंतीवेळीस प्रत्येक किल्ल्याची आठवण म्हणून तिथली माती ते सोबत आणत. छ. शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्श त्या मातीला आहेत आणि ती मातीच आपल्याला प्रेरणा आणि स्फुरण देते अशी त्यांची भावना असे. ह्याच भावनेतून त्यांनी विविध गडकोटांवरील मातीचा संग्रह करायला सुरुवात केली. त्यांच्या संग्रहात आज ३८ किल्ल्यांवरील माती आहे.

इतिहासाच्या आवडीमुळे २०१८ साली त्यांना नाणी संग्रह प्रदर्शन बघण्याचा योग आला. आणि प्रतिक यांच्या नाणीसंग्रहाला चालना मिळाली. आपल्या नाणी संग्रहाबद्दल प्रतिक सांगतात ” ठाण्याच्या ठोसर सरांचा नाणी संग्रह बघण्यात आला, त्यांच्या कडूनच नाण्यांबद्दल, विविध चलनाबद्दल माहिती मिळाली आणि माझ्या संग्रहाला एक वेगळीच दिशा मिळाली. श्री. ठोसर सर माझे नाणी संग्रहातील गुरु आहेत.” त्यांचा संग्रह बघितल्यापासून स्वराज्यलक्ष्मी असलेली शिवराई संग्रहात असावी असं प्रतिक यांचे स्वप्न होते आणि छ. शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. बघता बघता शिवराई, विविध राज्यकर्त्यांची नाणी त्यांच्या संग्रही गोळा होऊ लागली.

आपला संग्रह फक्त आपल्यापुरता न राहता त्याची माहिती पुढील पिढीलाही व्हावी ह्या हेतूने प्रतिक यांनी विविध शाळा, कॉलेज, विविध संस्था यांच्या सहकार्याने प्रदर्शने भरवणे चालू केले. आज पर्यंत त्यांची विविध ठिकाणी १६ प्रदर्शने झाली आहेत आणि ह्याचं संपूर्ण श्रेय ते त्यांचे गुरु, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला देतात.

गडकिल्ल्यांवरील माती, नाणी या खेरीज त्यांच्या कडे विविध शस्त्रांचा सुद्धा संग्रह आहे. आज त्यांच्या संग्रहात मराठा कालीन चांदी आणि तांब्याची नाणी ज्यात शिवराई व्यतिरिक्त शिंदे, होळकर, पवार, गायकवाड इत्यादी घराण्यांची नाणी आहेत. तसेच शस्त्र संग्रहात मराठा धोप ,समशेर,कट्यार ,वाघनखे, तोफगोळे, धनुष्यबाण, बिचवा इत्यादी गोष्टींचा संग्रह आहे.

आत्ताच्या पिढीला तसेच येणाऱ्या भावी पिढीला आपला हा जाज्वल्य इतिहास समजावा, त्याकाळी व्यवहार कसे चालायचे याची माहिती व्हावी व त्याची जाण व जपणूक प्रत्येकानी  करावी हीच प्रतिक यांची मनापासून ईच्छा आहे आणि ह्याची जाणीव ठेवूनच ते आपला संग्रह वाढवत आहेत.

Leave a comment