नाव : देवेंद्र हेमांगी हेमंत नामुले.

विलेपार्ले येथे राहणारे देवेंद्र मुंबई मध्ये एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. अगदी लहान वयात त्यांना नाणी संग्रह करण्याचा छंद लागला. छंदाची सुरुवात आजोबांनी दिलेल्या काही नाण्यांपासून झाली. आजोबांबरोबर खरेदीला जाणाऱ्या देवेंद्र यांना आजोबा शिल्लक राहिलेले सुट्टे पैसे द्यायचे. गंमत म्हणून देवेन्द्रही ते एका लहानश्या डब्यात साठवू लागले. आणि सुट्टीच्या दिवशी तो डबा काढून त्यात जमलेली नाणी बघत बसायचे. कुणी ओळखीतले परदेश वारी करून आले असेल तर आवर्जून त्यांच्या कडे जाऊन नाणी मिळवणे सुरु केले. आजोबांनी सुद्धा त्यांच्यातली आवड ओळखून त्यांच्याकडे असलेली काही ब्रिटिश कालीन नाणी देवेंद्रांना दिली. आणि अश्या रीतीने हळू हळू देवेंद्र यांच्या संग्रहाला सुरुवात झाली.

शिक्षण पूर्ण झालं, चांगली नोकरी लागली तरी छंद त्यांना स्वस्थ बसू देत नसे. सुरुवातीपासूनच इतिहास आणि सायन्स या विषयांची आवड असणाऱ्या देवेन्द्र यांना ऐतिहासिक पुस्तके वाचन आणि गडकिल्ले फिरण्याची सुद्धा आवड आहे. या आवडीतूनच त्यांना शिवकालीन किंवा प्राचीन नाणी संग्रही असावी असे वाटू लागले. आणि यातूनच त्यांचा शिवकालीन नाण्यांसाठीचा शोध सुरु झाला. २०१५ मध्ये त्यांना सर्वप्रथम रायगडी शिवराई मिळाली. त्याबद्दल देवेंद्र सांगतात ” रायगडी शिवराई, साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या सरदारांचा, मावळ्यांचा स्पर्श ह्या नाण्याला झाला असणार हि भावनाच वेगळी होती, अंगावर रोमांच आणणारी होती.”

नाणी संग्रहासोबतच ऐतिहासिक शस्त्र संग्रहाची सुद्धा देवेंद्र यांना आवड आहे. मराठा धोप, कट्यार, खंजीर हि त्यांची विशेष आवडीची शस्त्रे. शस्त्रांचा संग्रह करतानाच त्या संबद्धी संपूर्ण माहितीसुद्धा ते मिळवतात.

गडकिल्ले फिरताना त्या किल्ल्याचा इतिहास ट्यूबची माहिती ते स्थानिक लोकांकडून करून घेतात. त्याच बरोबरीने तीर्थस्थळांना भेट द्यायला सुद्धा त्यांना आवडते. जुनी तीर्थस्थळे, मंदिरांना भेट देऊन तिथल्या वास्तूंची माहिती ते घेत असतात.
आपल्या परंपरा , वारसा , संस्कृती जपणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठीच नाणी संग्रह, किल्ले भ्रमंती, आणि तीर्थस्थळांना भेट देणे अत्यंत महत्वाचे आहे अशी त्यांची धारणा आहे.