नाव – कौस्तुभ प्रदीप पालांडे
जन्मभूमी मुंबई आणि मूळ गाव निवे ( चिपळूण ) असणारा, कौस्तुभ पालांडे सध्या न्यूझीलंड, वेलिंग्टन ला राहतो आणि तो व्यावसायिक पेस्ट्री शेफ आहे.
बालपणी नाणी संग्रह म्हणजे काय ह्याची माहितीही नसणाऱ्या कौस्तुभ ला त्याच्या काकांनी काही परदेशी नाणी दिली आणि येथून त्याच्यातल्या नाणी संग्राहकाचा जन्म झाला. नाणी संग्रहाचा छंद त्याच्यात, लहानपणी त्याच्या काकांकडून रुजवला गेला. आधी परदेशी नाणी आणि मग स्वातंत्रोत्तर काळातील भारतीय नाणी त्याला देण्यात आली आणि हळू हळू नाण्यांविषयी त्याची आवड वाढत गेली.
त्याच्या आवडीच्या शिवराई नाण्यांविषयी कौस्तुभ सांगतो “छत्रपतींची नाणी ज्याला शिवराई म्हटले जाते ती सर्वात आधी मला ठाण्याच्या श्री. वैद्य काका यांच्या कडून मिळाली आणि माझ्या संग्रहात एका नवीन प्रकारच्या नाण्यांची भर पडली. शिवराई नाणी हातात घेतल्यावर एक वेगळेच समाधान, आनंद मनात निर्माण झाले. जस जसा नाण्यांचा अभ्यास ज्ञान वाढत गेले तसतसे शिवराई मध्ये विविध प्रकार असतात हे माझ्या लक्षात आले. आणि मग ह्या शिवराई चे जास्तीत जास्त प्रकार कसे आपल्या संग्रहात येतील ह्यासाठी प्रयत्न सुरु झाले.”
शिवराई हा फारच मोठा टॉपिक आहे. नाणी मिळवण्याच्या प्रयत्नात नवीन ओळखी झाल्या बरीच नवीन नाणी मिळाली आणि मग शोध सुरु झाला तो एका विशिष्ठ नाण्याचा, रायगडी शिवराईचा, ती सुद्धा परिपूर्ण अशी. रायगडी शिवराई संग्रहात असावी असे प्रत्येक शिवराई संग्राहकाने स्वप्न असते. रायगडी शिवराई त्यालाच डॉटेड बॉर्डर शिवराई मिळतात अशी आपल्या संग्रहात असावी असे कौस्तुभ चे स्वप्न होते. तश्या रायगडी शिवराई त्याच्या संग्रहात होत्याच पण परिपूर्ण म्हणता येईल अशी शिवराई आपल्या संग्रहात असावी अशी त्याची इच्छा होती. परिपूर्ण रायगडी शिवराई म्हणजे काय असे विचारात कौस्तुभ भरभरून सांगू लागला ” दोन्ही बाजूचे सर्व शब्द नाण्यावर दिसत आहेत आणि शब्दांच्या भोवतालची बिंदुमय बॉर्डर पूर्ण दिसत आहे अशी ती परिपूर्ण रायगडी शिवराई”
परिपूर्ण म्हणता येईल अशी रायगडी शिवराई संग्रही असणं अतिशय कठीण होतं . ते नाणे मिळवणं मुश्कीलच, त्यात तो देशापासून खूप दूर म्हणजे न्यूझीलंड ला राहत असताना तर त्याहून कठीण. पण त्याचा एक संग्राहक मित्र आणि एक संग्राहक सिद्धेश ब्राह्मणकर यांनी एक गोष्ट त्याला सांगितली होती कि काहीही झालं तरी “Coin finds the owner ” आणि ह्या वाक्याची शब्दशः प्रचिती त्याला न्यूझीलंड मधेच आली.
असेच एकदा परिपूर्ण शिवराई शोधण्यासाठी तो ऑनलाईन शोध घेत होता आणि त्याला हवे असणारे नाणे त्याला न्युमिस्टा साईट वर आढळून आले . थोडी माहिती काढली तेव्हा ते नाणे वेलिंग्टन मधेच एका जेष्ठ संग्राहका कडे आहे असे समजले. त्यांच्याशी संपर्क केला, ते ७६ वर्षाचे संग्राहक होते. आणि त्यांनी कॉइन त्यांचाच आहे असं संघितलं आणि इतक्या वर्षात कुठलेही नाणे विकले नाही आणि विकणारही नाही असं हि सांगितलं .
महाराजांचे नाणे इतक्या दूर देशी असेल हेच अशक्य आणि त्यातही परिपूर्ण नाणे जे महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळणार नाही असे. मग जवळपास २ आठवडे त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांना छत्रपतींचा माझ्या आयुष्यातील महत्व आणि रायगडी शिवराई चे महत्व पटवून दिले आणि ते नाणे द्यायला तयार झाले. त्यात ते नाणे विकणार नव्हते मग त्याच्या बदल्यात त्यांना माझ्या संग्रहातील काही नाणी दिली आणि अखेरीस माझे स्वप्न सत्यात उतरले. परिपूर्ण रायगडी शिवराई न्यूझीलंड मधेच माझ्या संग्रहात दाखल झाली. छत्रपतींचा स्पर्श नक्कीच त्या शिवाराई ला झाला असावा अशी माझी आस्था आहे. ते नाणे माझ्याकडे आले आणि सिद्धेश ब्राह्मणकर यांचं म्हणणं खरं ठरलं कि “Coin find the Owner “.